
दिवा:दिवा शहरातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अवघ्या १२ वर्षांच्या देवेंद्र आशिष सिंग या निष्पाप बालकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या बोगस डॉक्टरांच्या जीवघेण्या धंद्यामुळे आणखी एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप होत आहे.
माहितीनुसार, देवेंद्र याला दिवा परिसरात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे एका कथित “बंगाली डॉक्टर” कडून औषध देण्यात आल्यानंतर काही मिनिटांतच मुलाची प्रकृती गंभीर झाली. हात-पाय वाकडे होणे, बेशुद्ध पडणे अशी धक्कादायक लक्षणे दिसल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोंबिवलीहून मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आलेल्या देवेंद्रने तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिली; मात्र अखेर १ जून २०२६ रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुलाला नेमके कोणते औषध देण्यात आले? ते औषध कोणाच्या सल्ल्याने देण्यात आले? संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कायदेशीर परवाना होता का? तो खरोखर डॉक्टर होता की फक्त डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांच्या जीवाशी खेळत होता?
धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित कथित डॉक्टर हा एखाद्या अधिकृत दवाखान्यात नव्हे तर एका बिल्डरच्या कार्यालयात बसून उपचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर तो अचानक गावी निघून गेल्याची चर्चा असून त्यामुळे संशय अधिकच बळावला आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधासह कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिवा शहरातील सर्व बोगस डॉक्टर, परवान्याविना चालणारे दवाखाने, संशयित मेडिकल स्टोअर्स आणि अनधिकृत वैद्यकीय व्यवसायांवर संयुक्त धडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
आज देवेंद्र गेला आहे; उद्या दुसऱ्या कोणाच्या घरचा चिराग विझू नये, यासाठी प्रशासनाने आता जागे होण्याची गरज आहे. अन्यथा बोगस डॉक्टरांचे हे मृत्यूचे दुकान आणखी किती निरपराध जीव घेणार, हा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.
देवेंद्रला न्याय मिळणार का?
बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार का?
की पुन्हा एकदा एखाद्या निष्पाप बालकाचा मृत्यू फाईलमध्येच दफन होणार?
याकडे आता संपूर्ण दिवा शहराचे लक्ष लागले आहे.