
कल्याण : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांचा छडा लावत गुन्हे शाखा, घटक-3 कल्याणच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. सराईत घरफोड्या चोरटा राजेश अरविंद राजभर (वय 30) याला उत्तर प्रदेशातील आजमगढ येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडून 38 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पालघर व ठाणे ग्रामीण परिसरातील 21 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. चौकशीत आरोपीने अनेक घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याची पहिली पत्नी व भाऊ राकेश राजभर यांच्याकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी ठाणे आयुक्तालय, ठाणे ग्रामीण आणि रायगड परिसरात 33 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त (शोध-1) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सपोउपनिरीक्षक दत्ताराम भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, विजय जिरे, पांडुरंग भांगरे, सुधीर कदम, सचिन भालेराव, विलास कडू, सचिन कदम, आदिक जाधव, गोरक्षनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, सतीश सोनावणे, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.