
कल्याण:कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटित पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायाच्या मोठ्या रॅकेटचा महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद याच्यासह एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून २० पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपींनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत तसेच जबरदस्तीने देहव्यापारात ढकलल्याचे उघड झाले. ग्राहकांकडे महिलांना पाठवून मिळणाऱ्या पैशावर आरोपी उपजीविका करत असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने या संघटित टोळीविरुद्ध मोक्का कायद्याची कलमे लागू करण्यात आली.
या गुन्ह्यातील पाच महिला आरोपींना कारागृहातून ताब्यात घेऊन फेरअटक करण्यात आली. तसेच फरार आरोपी प्रशांत उर्फ कवा विरकुमार गायकवाड याला गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली.
दरम्यान, टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या सय्यद आणि फरार महिला आरोपी मिता नारायण बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच कल्याण पोलिसांचे विशेष पथक तातडीने रवाना करण्यात आले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांनाही ११ जुलै रोजी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेऊन ट्रान्झिट वॉरंटवर कल्याण येथे आणण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे कल्याण परिसरात संघटित देहव्यापार करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून महिलांच्या तस्करी आणि अनैतिक व्यापाराविरोधात ठाणे शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने करीत आहेत.