
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार (RTI) अर्जाचा आधार घेत तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या मुसक्या गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांनी आवळल्या. पेंढारकर कॉलेजजवळील बर्गर शॉपमध्ये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिपेश गौतम लोखंडे (३९), राहुल सुधाकर मुकादम (३०), विशाल गंगाराम जानकर (३१) आणि नरेश राजेंद्र सूर्यवंशी (२९) अशी आहेत. हे आरोपी MH-43-CM-0262 व MH-04-MN-7691 या वाहनांतून घटनास्थळी आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. अजवानी-मेटकॉन जॉईंट व्हेन्चर या कंपनीने एमआयडीसीतील नाले व गटाराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याबाबत कार्यकारी अभियंत्याकडे RTI अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा अर्ज मागे घेण्यासाठी कंपनीच्या सुपरवायझरकडे वारंवार १५ लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत आरोपींना रंगेहात पकडले.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ५५५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०८(२), ३०८(३) व ३०८(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान १५ लाखांची रोख रक्कम, ५ मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने असा एकूण ₹२१,१०,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाणे पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या आरोपींनी इतर कोणाकडेही अशाच प्रकारे खंडणीची मागणी केली असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि बळवंत भराडे, सपोनि सर्जेराव पाटील, पोउनि एस. एम. तावडे, सपोउपनि बालाजी शिंदे, पोहवा सुधीर कदम, पोहवा सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ जरग, सतीश सोनावणे, मिथुन राठोड आणि गोरक्ष शेकडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.