
कल्याण:कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड अचानक वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी धोकादायक व जीर्ण झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी किंवा हटविण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असतानाही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
“आज वाहनांचे नुकसान झाले, उद्या एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.