
डोंबिवली: शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत डोंबिवली शहरात वाहतूक विभागाकडून अनेक स्कूल बसची अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण २७ स्कूल बसची तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान बस चालकांचा परवाना, वाहनांची आवश्यक कागदपत्रे, बसमध्ये महिला अटेंडंटची उपलब्धता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यस्थिती तसेच चालक मद्य अथवा अन्य नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवत नाही ना याची सखोल पडताळणी करण्यात आली.
या तपासणीत विविध नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ९ स्कूल बसवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच सर्व स्कूल बस चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा नियमितपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे डोंबिवली वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी स्पष्ट केले.