
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून “क” प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कामकाजावर आता थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पथकाची गाडी तासन्तास एकाच ठिकाणी उभी असते, मात्र त्याच गाडीच्या आजूबाजूला फेरीवाले निर्धास्तपणे व्यवसाय करताना दिसत आहेत.
स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून “कारवाईच्या नावाखाली फक्त दिखावा सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक वेळा “आपले सरकार” पोर्टलवर तक्रारी करूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. कागदोपत्री कारवाई दाखवली जाते, पण जमिनीवर परिस्थिती तशीच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यामुळे स्टेशन परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता उरलेलाच नाही. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. “महापालिका टॅक्स घेण्यासाठी घरी येते, पण रस्ते मोकळे ठेवण्याची जबाबदारी कोणाची?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नागरिकांची ठाम मागणी : १)अतिक्रमण विरोधी पथकाची तात्काळ चौकशी करण्यात यावी
२)संबंधित पथक प्रमुखावर कठोर कारवाई करून निलंबन करावे
३)कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवावीत
4)नागरिकांना चालण्यासाठी मोकळे रस्ते उपलब्ध करून द्यावेत
जर प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष दिले नाही, तर येत्या काळात नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.