
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ठाणे पोलिसांच्या स्मार्ट, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवरील विविध शासकीय कार्यालयांचे दोन टप्प्यांत मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) अशा एकूण सात महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता.

राज्यातील १२ पोलीस आयुक्तालयांमध्ये झालेल्या या स्पर्धात्मक मूल्यमापनात ठाणे पोलीस आयुक्तालयाने उत्कृष्ट समन्वय, नवकल्पना आणि प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर द्वितीय स्थान मिळवले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस दलाने नागरिकाभिमुख सेवा, डिजिटल सुविधा आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न विशेष ठरले आहेत.
या यशामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्यात एक आदर्श निर्माण केला असून, भविष्यात अधिक प्रगत आणि तंत्रज्ञानस्नेही सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.