
दि :२१ कल्याण : परिमंडळ ३ मध्ये पोलिसांनी मध्यरात्री जोरदार धडक कारवाई करत बार आणि रेल्वे स्टेशन परिसरातील गैरप्रकारांवर मोठा आळा घातला. अवैध प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांना थेट कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील अश्लीलता आणि अनैतिक धंद्यांना थारा दिला जाणार नाही.
काल रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रिगल बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच एसीपी सुहास हेमाडे यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी धडक दिली. अचानक तपासणीदरम्यान बारमध्ये तब्बल २३ मुली आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गुंड, API संपत फडोळ, API के. आर. पाटील व इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.
सदर प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. १९९/२६ भा.न्या.सं. कलम २९६, २२३, ५४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
त्याच रात्री कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष मोहीम राबवली.
या कारवाईत ०४ एजंट आणि १० पीडित महिलांसह एकूण १४ जणांवर ‘पिटा’ (अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गुरजि.नं. १०७/२६ बीएनएस कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बार, लॉज, तसेच तत्सम आस्थापनांवर पुढील काळातही अशीच तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मध्यरात्रीच्या या कारवाईमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.