दि.२३ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली इयत्ता ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. २२) सुरळीत वातावरणात पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित या परीक्षेत इयत्ता ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४९ शाळांमधील ४३०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तर इयत्ता ८ वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १९५ शाळांमधील २४३९ विद्यार्थी परीक्षेला बसले. एकूण ६७४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
या परीक्षेसाठी महानगरपालिका क्षेत्रात २८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. केंद्रांवर देखरेख व नियोजनासाठी सुमारे ४५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व केंद्रांवर काटेकोर नियोजन करण्यात आल्याने परीक्षा शांततेत पार पडली.
शिष्यवृत्ती परीक्षेचे संपूर्ण नियोजन प्रशासन अधिकारी भारत बोरनारे व शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
दरम्यान, महापौर हर्षाली थवील-चौधरी, उपमहापौर राहुल दामले तसेच आयुक्त अभिनव गोयल यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शासन निर्णयानुसार चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वीबरोबरच इयत्ता ४ थी तसेच इयत्ता ८ वीबरोबरच इयत्ता ७ वीची शिष्यवृत्ती परीक्षा दि. २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती प्रशासन अधिकारी बोरनारे यांनी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ४ थी व ७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे नियमित आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.