
बदलापूर (प्रतिनिधी) : “पेट्रोल संपणार” या अफवेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून अंबरनाथ व बदलापूर परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर वेगाने पसरलेल्या या अफवेवर विश्वास ठेवत अनेक नागरिकांनी घाईघाईने पेट्रोल भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली. परिणामी, काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली तर काही पंपांवर तात्पुरती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान, अधिकृत सूत्रांकडून कोणतीही पेट्रोल टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तेल कंपन्यांकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी शांतता राखून अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच केवळ आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.