
डोंबिवली(प्रतिनिधी):सन २०१४ मध्ये अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी) या तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाचा तब्बल १२ वर्षांनी थरारक उलगडा करण्यात कल्याण गुन्हे शाखा घटक-०३ ला यश आले आहे. अपहरण करून लोखंडी रॉडने निर्दयीपणे खून करत प्रेत घनदाट जंगलात फेकून पुरावे नष्ट करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तपासात उघड झाले की, जमीन व्यवहारातील आर्थिक वादातून मुख्य आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याने ४ ऑक्टोबर २०१४ रोजी करण बागुल याचे अपहरण करून दावडी येथील कार्यालयात नेले. तेथे लोखंडी रॉडने तोंड, डोके व कपाळावर सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर साथीदार चंद्रकांत गायकर व सुरेश देगावत उर्फ छोटू यांच्या मदतीने मृतदेह स्विफ्ट कारमधून मुरबाडजवळील बारवी डॅम परिसरातील घनदाट जंगलात टाकून देण्यात आला.
गुन्हे शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासातून मुरबाड पोलिसांकडे २०१४ मध्ये सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची नोंद शोधून काढण्यात आली आणि तो मृतदेह करण बागुल याचाच असल्याची खात्री पटली. यानंतर मूळ अपहरणाच्या गुन्ह्यात खून, पुरावा नष्ट करणे व सामूहिक हेतूची कलमे वाढवण्यात आली.
पोलिसांनी खुनासाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉडही जप्त केला असून तिन्ही आरोपींना न्यायालयाने २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे मुख्य आरोपी सुरेंद्र पाटील हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, मारहाण, शस्त्र बाळगणे, धमकी, लैंगिक अत्याचारासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१२ वर्षे अंधारात असलेल्या खुनाच्या गूढावर अखेर प्रकाश टाकत कल्याण गुन्हे शाखेने दाखवलेल्या या धडाकेबाज कामगिरीची शहरभर चर्चा सुरू आहे.