
डोंबिवली (प्रतिनिधी): लोढाहेवन-निळजे येथे वैशाखी पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा महोत्सवानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांचा २०८८ वा जयंती महोत्सव-२०२६ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा महोत्सव बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.७११, पंचशील सामाजिक संस्था (रजि.) आणि पंचशील महिला मंडळ, लोढाहेवन-निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यंदा बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आल्याने कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. सकाळी १० वाजता बुद्धवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर “सुखी करणारा बुद्ध” या विषयावर अर्चनाताई मोहिते (प्राचार्या, निवेदिका) यांनी धम्म प्रबोधनपर प्रवचन देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर उपस्थितांसाठी खिरदान व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले असून रात्री “हरवलेल्या नात्यांचे रेशन कार्ड” या एकांकिकेचे विशेष सादरीकरण करण्यात आले.
या महोत्सवात उपासक-उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थिती लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सम्यक बुद्धविहार, लोढाहेवन-निळजे परिसर भक्तिमय केला.
संपूर्ण परिसरात धम्म, शिस्त, सामाजिक एकात्मता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.