
डोंबिवली: नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींवरच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्याशी गैरवर्तन व मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांवर महिला डॉक्टर, दोन डॉक्टर व तीन नर्स यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे कथित CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
माहितीनुसार, एका गर्भवती महिलेच्या उपचारादरम्यान नवजात बाळाला एनआयसीयू उपचारांची गरज लागू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड भरले असल्याने अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूप कथित मारहाणीत झाल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कामबंद आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण झाले असून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
“डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांवर कायद्याचा बडगा कधी?” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.