
डोंबिवली : डोंबिवली शहरातील अपुऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांचा फायदा घेत काही लक्झरी बस चालक-मालक, ट्रॅव्हल्स ऑपरेटर, रेडीमिक्स मिक्सर,रेती वाहतूक करणारे ट्रक-डंपर तसेच इतर खाजगी बस चालकांकडून प्रवेशबंदीच्या वेळेतही शहरात सर्रास वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अरुंद रस्ते असलेल्या डोंबिवली शहरात ही वाहने पिक-अप, ड्रॉप तसेच मार्गक्रमण करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे.
डोंबिवलीच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक शाखेचे कर्मचारी अत्यल्प प्रमाणात असून ट्रॅफिक वॉर्डनवरच बहुतांश जबाबदारी असल्याने शहरातील वाहतूक नियमन व संचालन प्रभावीपणे होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांनी सांगितले की, योग्य वेळी लक्झरी बसचे अनधिकृत पिकअप पॉइंट बंद न केल्यास आणि प्रवेशबंदीच्या वेळेत जड-अवजड वाहनांना रोखले नाही, तर इतर वाहनचालकही नियम धाब्यावर बसवून शहरात प्रवेश करतील व त्यामुळे संपूर्ण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, प्रवेशबंदीच्या वेळेत पिकअप-ड्रॉप करणाऱ्या सर्व लक्झरी बसेस तसेच शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या जड-अवजड वाहनांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश कल्याण आरटीओ आणि डोंबिवली वाहतूक शाखेला द्यावेत.