
दि २ कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी तसेच स्कूल बस चालक-मालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांमुळे सभागृह भरले होते.
“सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा, सुरक्षित प्रवास” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी सकाळी ३.३० वाजता के.सी. गांधी सभागृह, वल्लीपीर रोड, कल्याण (पूर्व) येथे पार पडला.
कार्यक्रमात उपप्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांनी “स्कूल बस म्हणजे नेमके काय?” याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्कूल बसची कायदेशीर व्याख्या, आवश्यक कागदपत्रे, शासनाने निर्धारित केलेले सुरक्षा निकष, चालकांची पात्रता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीचे नियम यांची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या विशेष चित्रफितीच्या माध्यमातून पालकांचे प्रभावी प्रबोधन करण्यात आले. सुरक्षित प्रवासाचे महत्त्व या चित्रफितीतून अधोरेखित करण्यात आले.
केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी . प्रसाद बोरकर यांनी शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन, पालक आणि वाहतूक व्यवस्था यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत शाळा परिसरातील सुरक्षा, प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या शिबिरासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ, महात्मा फुले, खडकपाडा व कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, बळीरामसिंग परदेशी अमरनाथ वाघमोडे व . हेमंत गुरख यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे पालक, विद्यार्थी तसेच स्कूल बस चालक-मालक यांच्यात सुरक्षा विषयक जागरूकता वाढीस लागून शहरात सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीस चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.