
दि.१४कल्याण :१२वीच्या परीक्षेसाठी जात असताना गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडून १८ वर्षीय विद्यार्थी स्व. सचिन काथरे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ अपघात नसून, उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची बेफिकिरी उघड करणारी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया वल्ली राजन, राज्य सचिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वल्ली राजन यांनी कल्याण रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन सादर करत परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त लोकल गाड्या तसेच स्वतंत्र, सुरक्षित डबे तातडीने सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी आणि समाजसेवक तोषेश लक्ष्मीपती शुक्ला उपस्थित होते.
दरवर्षी परीक्षा काळात हजारो विद्यार्थी प्रचंड गर्दीत, जीव धोक्यात घालून लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. ही बाब प्रशासनाच्या पूर्णपणे निदर्शनास असतानाही अद्याप ठोस उपाययोजना न होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर किमान १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित “Student Special Compartment” सुरू करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख मागण्या :
परीक्षा कालावधीत अतिरिक्त लोकल गाड्या किंवा डबे तातडीने सुरू करावेत.
१२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित डबे उपलब्ध करून द्यावेत.
पीक अवर्समध्ये गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन व कडक अंमलबजावणी करावी.
“मानवी जीवन हे कोणत्याही व्यवस्थेपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणखी कोणत्याही विद्यार्थ्याचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत,” असा इशारा वल्ली राजन यांनी यावेळी दिला.