
दि १६कल्याण : कल्याण पूर्व परिसरात वाहनचोरीचे प्रकार वाढत असतानाच कोळसेवाडी पोलिसांनी अतिशय वेगवान आणि अचूक कारवाई करत वाहनचोर टोळीला अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत दुचाकी, स्कूटर व रिक्षा अशी एकूण ३ लाख ४० हजार रुपयांची चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि १२ रोजी रात्री १० ते १३ रोजी सकाळी ९ या कालावधीत पत्रीपुलजवळील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला, कल्याण पूर्व येथे रस्त्यालगत पार्क केलेली ७० हजार रुपये किमतीची सुझुकी एव्हेनेक्स मोटारसायकल (MH-05/FU-0658) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी रिक्षाचालक सलमान जाहीद सिद्दीकी (वय २१, रा. वाघमारे चौरे चाळ, पत्रीपुल, कल्याण पूर्व) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच सुचक नाका परिसरात संशयित फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवालदार विशाल वाघ यांना मिळाली. त्यानुसार तातडीने पथक रवाना करून प्रबोधनकार शाळेच्या मागे, नेतीवली, कल्याण पूर्व येथे सापळा रचण्यात आला. यावेळी
आशु संतोष सिंग (वय २३, रा. मातृछाया बंगला, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व)
आणि
अमन राधेश्याम जयस्वाल (वय २३, रा. दयानंद ठाकूर चाळ, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व)
या दोघांना चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.
अटक केल्यानंतर अधिक तपासात आरोपींनी हिललाईन पोलीस ठाणे व राबोडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून
₹७०,००० किमतीची सुझुकी एव्हेनेक्स मोटारसायकल,
₹९०,००० किमतीची सुझुकी अॅक्सेस १२५ स्कूटर (MH-05/BG-2881),
₹१,८०,००० किमतीची बजाज कंपनीची रिक्षा (MH-04/LX-2738)
अशी वाहने जप्त करण्यात आली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) कल्याण, अतुल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत सपोनि संदीप भालेराव, पोहवा विशाल वाघ, पोहवा गोरखनाथ घुगे, पोहवा सचिन आव्हाड, पोहवा दत्तु जाधव, पोना दिलीप कोती व पोशि राहुल खरे यांनी सहभाग घेतला.