
दि.१३कल्याण : महाराष्ट्र पोलीस यांच्या परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत दामिनी पथकाने महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबवत जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत तब्बल १०१३ जणांवर कठोर कारवाई केली आहे. व्हॅलेंटाईन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलींची छेडछाड, अश्लील कृत्ये व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही धडक मोहीम हाती घेण्यात आली.
गर्दीच्या ठिकाणी कडक नजर:
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व डोंबिवली शहरातील मॉल, उद्याने, बाग-बगीचे, निर्जन स्थळे, शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष गस्त वाढविण्यात आली. शाळकरी मुली, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत दामिनी पथकाने संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले.
कारवाईचा तपशील
जानेवारी २०२६ पासून करण्यात आलेल्या कारवाईत —
मापोका कलम ११० अंतर्गत : ६२ जणांवर कारवाई
मापोका कलम ११२, ११७ अंतर्गत : ४८१ जणांवर कारवाई
कोप्ता कलम ४, २१ अंतर्गत : ४७० जणांवर कारवाई
एकूण कारवाई : १०१३
गुन्ह्यांना वेळीच आळा

शाळा व कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड, व्यसनाधीन तरुणांकडून होणारा त्रास, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे, आरडाओरड करून शांतता भंग करणे अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध करण्यात आला. पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, महिला सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.
पालकांना आवाहन
परिमंडळ ३ मधील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, महिला सुरक्षेसंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित डायल ११२ वर संपर्क साधावा.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कल्याण व डोंबिवली शहरात दामिनी पथकाची ही विशेष मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार.