
दि.२९ कल्याण: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेने राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने एकत्र आले. अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी उपस्थितांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी दादांचे निर्भीड नेतृत्व, जनतेसाठी अखंडपणे केलेले कार्य आणि संघर्षमय राजकीय वाटचाल यांची आठवण उपस्थितांच्या मनात दाटून आली. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
अजितदादा पवार यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी असून, त्यांच्या आठवणी आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.