
चिपळूण:कोकणातील चिपळूण आणि खेड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि CNG चा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे अक्षरशः हाल होत आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक आणि प्रवासी बाहेर फिरण्यासाठी निघाले असतानाच अचानक निर्माण झालेल्या इंधन टंचाईने नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
पेट्रोल पंपांबाहेर पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. वाढत्या उकाड्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह अनेक प्रवासी तासनतास उन्हात उभे राहून इंधन मिळण्याची वाट पाहताना दिसले. काही ठिकाणी तर CNG संपल्याचे फलक लावण्यात आल्याने वाहनचालकांचा संताप अनावर झाला.
विशेष म्हणजे, या टंचाईमागचे नेमके कारण काय याबाबत पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नागरिकांना काही आवाहने केल्यानंतरच ही परिस्थिती निर्माण झाली का? असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, प्रशासन आणि संबंधित कंपन्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मात्र सामान्य जनतेला बसत असून, “सुट्टीत फिरायला निघालो पण पेट्रोलसाठीच दिवस गेला,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक वाहनधारकांनी व्यक्त केली.
चिपळूण-खेड परिसरातील ही इंधन टंचाई नेमकी तांत्रिक बिघाडामुळे, पुरवठा खंडित झाल्यामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे निर्माण झाली? याबाबत प्रशासनाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.