
डोंबिवली:डोंबिवलीतील 90 फूट रोडवरील 90 फीट चहा वालासमोरील बाजूस असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर अचानक कोसळल्याने एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रान्सफॉर्मर थेट एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेली मुलगी नशिबाने बचावल्याने संभाव्य जीवितहानी टळली यात गाडीचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, केडीएमसीचे वॉर्ड अधिकारी ठाकूर तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी प्रदीप चौधरी यांनी महावितरणच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. महावितरणने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.
मात्र केडीएमसीचे वॉर्ड अधिकारी ठाकूर आणि महावितरणचे अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलणे टाळल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
या ट्रान्सफॉर्मरला महानगरपालिकेची परवानगी होती का? पडलेल्या ट्रान्सफॉर्मरची यापूर्वी कोणाकडून तक्रार करण्यात आली होती का? त्याची नियमित तपासणी झाली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
जर या दुर्घटनेत त्या दोघांचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती? असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महावितरण आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.