
दि.९ भाईंदर (प्रतिनिधी) : गोस्वामी समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर परिचय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गोसवामी सेवा समितीतर्फे पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा रविवारी (८ मार्च २०२६) भाईंदर पूर्व येथील अंबेश बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील अनेक कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कुटुंब परिचय सत्रात विविध कुटुंबांनी आपला परिचय करून दिला. पुढे आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती जागरण भजन संध्येमुळे सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
यानंतर स्वागत समारंभ व सामाजिक विषयांवरील मार्गदर्शनपर भाषणांचा कार्यक्रम पार पडला. समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात समितीचे अध्यक्ष संतोष लाल गिरी, उपाध्यक्ष रामसेवक सी. गिरी, अयोध्याप्रसाद गिरी, कार्यकारी अध्यक्ष हरिश्चंद्र पुरी, उपाध्यक्ष महेंद्र गिरी, सचिव राम घनश्याम गोस्वामी, सहसचिव ओमप्रकाश गिरी, कोषाध्यक्ष तसेच संघटन सरचिटणीस राजबली गिरी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाजातील सर्व सदस्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
अशा उपक्रमांमुळे समाजात आपुलकी, एकात्मता आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शेवटी सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.