पोलिस–प्रतिष्ठानच्या संयुक्त पुढाकारातून ३८५ जणांचे श्रमदान

दि. १ (कल्याण) : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत रविवारी सकाळी व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान पार पडले.
दि. ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून खडकपाडा सर्कल ते बिर्ला कॉलेज मुख्य रस्ता तसेच खडकपाडा सर्कल ते दुर्गाडी मुख्य रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्त्यांवरील कचरा, प्लास्टिक व इतर घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रांत अधिकारी कल्याण, खडकपाडा पोलीस ठाणे तसेच परिमंडळ ३ मधील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. एकूण ४० अधिकारी आणि २१० पोलीस कर्मचारी यांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.
तसेच प्रतिष्ठानचे १७५ स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नागरिकांनीही अशा मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.