
डोंबिवली: डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी पर्दाफाश करत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याची उकल केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ६४ वर्षीय नागरिकाच्या डोक्यात काठीने वार करून गळ्यातील सोन्याची चेन लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा विधीसंघर्षीत बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
२४ मे रोजी पहाटे गावदेवी जेट्टी परिसरात फेरफटका मारत असलेल्या सुगंध मंगल्या म्हात्रे यांच्यावर दोन दुचाकीस्वारांनी हल्ला चढवला. डोक्यात काठीचा फटका मारून त्यांना खाली पाडल्यानंतर गळ्यातील सुमारे २६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गुन्हा दाखल होताच विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. गुन्ह्यापूर्वी रेकी करून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आल्याचे समोर आले.
पोलिसांनी चिंतन नंदा (२०), मोहित जाधव (१९) आणि चोरीचा मुद्देमाल विक्रीस मदत करणारा स्वप्नील भोईर (२७) यांना अटक केली. आरोपींकडून लुटलेली २५.२८० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील बहुतांश सदस्य हे १६ ते १८ वयोगटातील विधीसंघर्षीत बालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेकी करणे, लक्ष्य निवडणे आणि मारहाण करून लूट करणे अशा पद्धतीने त्यांनी गुन्ह्याची अंमलबजावणी केल्याचे उघड झाले आहे.
मा. अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक गहिणीनाथ गमे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.