
दि.11 डोंबिवली :कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) उभारलेले बस स्थानक हे प्रवाशांसाठी आहे की भाजीविक्रेत्यांसाठी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कल्याण पूर्वेतील टाटा पॉवर परिसरात, सिद्धिविनायक सोसायटीच्या गेटसमोर उभारण्यात आलेल्या बस स्थानकावर भाजी विक्रेत्यांनी सर्रास दुकानं मांडल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या या बसथांब्यावर प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा उरलेली नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
प्रवाशांची गैरसोय, प्रशासन मात्र मौन?
दररोज शेकडो नागरिक या बस स्थानकाचा वापर करतात. मात्र सध्या येथे भाजीच्या टोपल्या, टेबल, छत्रीमुळे संपूर्ण बसथांबा व्यापलेला दिसतो. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
कारवाई कधी?
कल्याण शीळ रोड वरील रहदारीच्या ठिकाण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष गेले नसावे का? अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बस स्थानकाचे मूळ उद्दिष्ट प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा देणे हे असताना तेथेच अनधिकृत विक्री सुरू असल्याने KDMC च्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
स्थानिकांनी तात्काळ कारवाई करून बस स्थानक मोकळे करण्याची मागणी.